जळगाव : जामनेर तालुक्यातील गोद्री येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये रविवार (दि. 4) रोजी कौटुंबिक वाद झाला. हा वाद वाढून विकोपाला जाऊन पत्नीला झालेल्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील गोद्री या ठिकाणी विशाल चव्हाण हा पत्नी काजल चव्हाण व सासू सासरे यांच्यासह राहत होते. विशाल व काजलचे नुकतेच काही महिन्यापूर्वी लग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न केले. मात्र रविवार (दि.4) रोजी वाद विकोपाला गेला. रात्री नऊ वाजेला पती विशाल चव्हाण याने रागाच्या भरात काजलच्या तोंडावर नाकावर दांड्याने व इतर धारदार वस्तूने मारहाण केली. या मारहाणीमुळे काजल गंभीर जखमी झाली. त्यामुळे तत्काळ काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी भरती करण्यात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी काजोलच्या नातेवाईकांमध्ये आक्रोश व्यक्त केला. जामनेर पोलिसांनी पती विशाल याला अटक केली असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत.