Jalgaon District Central Cooperative Bank: जिल्हा बँकेत 'दहा'चा फेरा, जळगावातील खडसे, देवकर यांच्यासह 9 दिग्गजांचा पत्ता कट?

बँकिंग सुधारणा कायद्याचा मोठा दणका; खडसे, पवारांसह ९ दिग्गज नेते निवडणुकीतून 'आऊट'
Jalgaon District Central Cooperative Bank
Jalgaon District Central Cooperative Bank
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेच्या खुर्चीवर अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या दिग्गज नेत्यांना केंद्र सरकारच्या नव्या कायद्याने जोरदार झटका दिला आहे. बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ नुसार, सलग १० वर्षे संचालक पदावर राहिलेल्या नेत्यांना आता अपात्र ठरवण्यात आले असून, १ ऑगस्ट २०२५ पासून हे नेते तांत्रिकदृष्ट्या निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत. यात आमदार एकनाथ खडसे, चेअरमन संजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील नऊ बड्या नेत्यांचा समावेश असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

नेमका नियम काय?

केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ लागू केला आहे. या कायद्यानुसार, कोणत्याही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एखादी व्यक्ती सलग १० वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक म्हणून राहू शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून १ ऑगस्ट २०२५ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

जळगावचे हे 'नऊ' दिग्गज रडारवर

नव्या नियमाच्या कत्रीत जळगाव जिल्हा बँकेचे सध्याचे कारभारी अडकले आहेत. यात प्रामुख्याने खालील नावांचा समावेश आहे:

१. संजय पवार (विद्यमान चेअरमन)

२. एकनाथ खडसे (आमदार व ज्येष्ठ नेते)

३. अमोल पाटील (आमदार व व्हाईस चेअरमन)

४. किशोर पाटील (आमदार, पाचोरा)

५. अनिल पाटील (आमदार व मंत्री)

६. गुलाबराव देवकर (माजी मंत्री)

७. चिमणराव पाटील (माजी आमदार)

८. ॲड. रवींद्र भैय्या पाटील (ज्येष्ठ संचालक)

९. रोहिणी खडसे (माजी अध्यक्षा)

निवडणूक लढवण्यावर बंदी

राज्य शासनाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी रिझर्व्ह बँकेकडे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले हे नेते आता आगामी निवडणुका लढवू शकणार नाहीत. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या घराणेशाहीला आणि मक्तेदारीला लगाम बसणार असल्याचे बोलले जात आहे.

नव्या चेहऱ्यांची लागणार वर्णी?

जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा बँकेतून एकाच वेळी नऊ दिग्गज बाहेर फेकले गेल्यामुळे आता दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे आपल्या घरातील महिलाना किंवा मुलांना या आपल्या या सहकारातील क्षेत्रामध्ये भविष्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news