Jalgaon Bank Election: मतदान केंद्रावरच रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांच्यात शाब्दिक खडाजंगी, नेमकं काय घडलं?

मतदानादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
Jalgaon Bank Election
Jalgaon Bank Election
Published on: 
Updated on: 

Jalgaon Bank Election:

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘महायुतीचा धर्म’ पाळल्याचा दावा केला असला, तरी मुक्ताईनगर मतदान केंद्रावर मात्र भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदानादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलवरून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर थेट बोगस मतदानाच्या गंभीर आरोपांमध्ये झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमका वाद कशामुळे पेटला?

मुक्ताईनगर येथील मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे मतदानासाठी आल्या असता, त्यांच्यासोबत असलेल्या शासकीय सुरक्षा लवाजम्यावर (प्रोटोकॉल) आमदार चंद्रकांत पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. या प्रोटोकॉलच्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आमदार पाटील यांनी व्यक्त केला. एवढ्यावरच न थांबता, रक्षा खडसे यांचे एकाच वेळी तीन ठिकाणी मतदान असल्याचा खळबळजनक आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केल्याने मतदान केंद्रावर मोठा तणाव निर्माण झाला.

रक्षा खडसे यांचे जोरदार प्रत्युत्तर

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले सर्व आरोप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी फेटाळून लावले. प्रोटोकॉलच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, "हा प्रोटोकॉल आम्हाला शासनाकडून अधिकृतरीत्या सुरक्षेसाठी मिळालेला आहे. त्यामुळे सुरक्षेची यंत्रणा माझ्यासोबत असण्यात गैर काय?" तसेच, तीन ठिकाणी मतदान असल्याचा आमदार पाटील यांचा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा असल्याचे सांगत त्यांनी या आरोपांचे खंडन केले.

महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर

जिल्हा बँकेच्या २१ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ९ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. एका बाजूला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी झाली असली तरी सर्वच जागा महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, मुक्ताईनगरमध्ये महायुतीतीलच दोन प्रमुख लोकप्रतिनिधी भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार जाहीरपणे आमने- सामने आल्याने भाजप-शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.