

जळगाव : जिल्ह्याचा पारा ४४ अंशांच्या पार गेलेला असताना, शासकीय रुग्णालयांमधील उष्माघात कक्ष सज्ज असल्याचे दावे फोल ठरत आहेत. धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (आर.एच.) उष्माघात कक्षासाठी आलेले कुलर चक्क नर्स रूममध्ये थंड हवा खात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच, अवघ्या एका तासात कुलर जागेवर आले आणि 'पुरावा' नष्ट करण्यासाठी संबंधित रुग्णालाच दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले.
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात सुनील गोरख पारधी या रुग्णाला उष्माघाताच्या संशयावरून भरती करण्यात आले होते. उष्माघात कक्षात रुग्णाला तातडीने थंडावा मिळणे अपेक्षित असताना, त्या ठिकाणी साधा पंखाही सुरू नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, या कक्षासाठी मंजूर असलेले कुलर ज्या ठिकाणी परिचारिका (नर्स) बसतात, तिथे पळवण्यात आले होते. रुग्ण उष्णतेने व्याकुळ होत असताना यंत्रणा मात्र एसी आणि कुलरच्या हवेत मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील समाधान यांच्याकडे तक्रार करण्यासाठी प्रतिनिधी गेले असता, ते मुंबईला बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचा पदभार असलेले अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी यांची भेट घेतली असता, त्यांनी "मला याबाबत काहीच माहिती नाही, तुम्ही निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुपे यांना भेटा" असे सांगून आपली जबाबदारी झटकली.
डॉ. सुपे यांनी धरणगाव आर.एच. ला संपर्क साधला असता, तिथल्या डॉ. दीपक साळुंखे यांनी 'असा कोणताही प्रकार नाही' असा कानावर हात ठेवणारा जवाब दिला. मात्र, प्रतिनिधीने जाब विचारताच, "मी फोटो मागवले आहेत, चौकशी करून सांगतो, मी सध्या रुग्णालयात नाही," अशी सारवासारव डॉ. साळुंखे यांनी केली.
वरिष्ठ पातळीवर तक्रार पोहोचताच धरणगाव रुग्णालयात हालचालींना वेग आला. अवघ्या एका तासाच्या आत नर्स रूममधील कुलर पुन्हा उष्माघात कक्षात आणून ठेवण्यात आले. तसेच, ज्या रुग्णामुळे हे बिंग फुटले, तो रुग्ण 'अल्कोहोलिक' असल्याचे कारण सांगत त्याला तडकाफडकी दुसऱ्या वॉर्डात शिफ्ट करण्यात आले. तक्रारदाराचा मुद्दाच खोडून काढण्यासाठी प्रशासनाने ही 'तत्परता' दाखवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांवर असताना उष्माघात कक्षातील सुविधा इतरत्र वापरणाऱ्यांवर कारवाई होणार का? रुग्णालयातील डॉक्टरांच्या केबिनमध्ये 'एसी' कुणाच्या आदेशाने लावण्यात आले? ग्रामीण भागातील गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या मुजोर प्रशासनाला जिल्हा शल्यचिकित्सक लगाम घालणार का? असे प्रश्न उपस्थित होत असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.