

जळगाव : मुक्ताई पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जळगावात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका खास क्षणाला साक्षीदार ठरवत आपल्या लाडक्या बहिणीच्या रिक्षेत प्रवास केला. पिंक रिक्षा चालवणाऱ्या रंजना सपकाळे यांच्या आग्रहास्तव एकनाथ शिंदे यांनी विमानतळावरून रिक्षाने प्रवास केला.
यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन हे देखील रिक्षेत बसले होते. रंजना सपकाळे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “एकनाथ शिंदे माझ्या रिक्षात बसले, हे मला एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय. मला खूप आनंद झाला आहे. मी त्यांना 'बिग ब्रदर' म्हणते, त्यामुळे मी आता माझ्या रिक्षावर त्यांचा ‘बिग ब्रदर’ असा पोस्टर लावणार आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “एकनाथ शिंदेसारखा भाऊ कोणालाही लाभावा, जो प्रत्येक महिन्यात मला दिवाळी देतो. गुलाबराव पाटील व गिरीश महाजन हेही माझ्या रिक्षात बसले, याचा मला खूप अभिमान वाटतो. आज मला बोलताही येत नाहीये.”
“मुख्यमंत्री कोण व्हावं हे महत्वाचं नसतं, तर माणूस कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्त्व काय आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं,” असेही भावूक उद्गार रंजना सपकाळे यांनी काढले.