

जळगाव : जिल्ह्यातील महिला बालकल्याण विभागात अधिकारी पदावरील मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने शनिवार (दि.१४) रोजी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी मयुरी करपे यांच्या माहेरच्या मंडळींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा जिल्हा रुग्णालयात घेतला आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तहसीलदारांची चर्चा झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला आहे.
महिला बालकल्याण अधिकारी मयुरी देवेंद्र राऊत करपे (वय ३२, रा.श्रीराम नगर, दादावाडी परिसर, जळगाव) असे मयत महिला अधिकारी यांचे नाव आहे. त्यांचे पती देवेंद्र राऊत हे देखील जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण विभागात कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान, पती देवेंद्र राऊत यांना बीपीचा त्रास होत असल्याने जळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखविण्यासाठी आणले होते. त्याचवेळी अचानक मयुरी करपे यांची देखील प्रकृती बिघडली. त्यांना भोवळ येऊन त्या खुर्चीवरुन खाली पडल्याने जागीच कोसळल्या. त्या ठिकाणी मयुरी करपे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
मयुरी यांचा मृत्यू झाल्याने रविवारी (दि.१५) रोजी मयुरी करपे यांचे वडील शेतकरी भाऊसाहेब करपे हे त्यांच्या परिवारासह जळगावात आले असता शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मयुरीचा मृतदेह पाहून कुटुंबाने आक्रोश करत सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित हे देवेंद्र राऊत यांना मानसिक त्रास देत होते. बैठकांमध्ये सतत अपमान करणे, त्यांना असभ्य भाषेत बोलणे अशा पद्धतीचा त्रास त्यांनी दिला. त्यामुळे देवेंद्र राऊत हे मानसिक तणावात होते. तणावामुळे त्यांनी काही काळ रजादेखील घेतली होती. दवाखान्यात सातत्याने उपचार सुरू होते. त्यामुळे पूर्ण कुटुंबच मानसिक तणावाखाली गेले. देवेंद्र राऊत व त्यांच्या पत्नी मयुरी राऊत यांचेदेखील त्यामुळे मनस्वस्थ बिघडले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे ज्या पद्धतीने प्रशासनाशी बोलतात, वागतात व कामकाज करतात. त्यामुळे मुलीचा बळी गेला आहे, असे मयुरी यांचे वडील भाऊसाहेब करपे यांनी सांगितले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना मानसिक तणावाखाली ठेवून त्यांचे मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाऊसाहेब करपे यांनी यावेळी केली आहे.