

जळगाव : यावल व जळगाव तालुक्याच्या सीमेवर तापी व पूर्णा नदीवर उभारण्यात आलेल्या शेळगाव बॅरेजचा साडेचार हजार टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने बॅरेजचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
धरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये 14 दरवाजे दीड मीटरने व 4 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बॅरेजमधील गाळ पाण्याबरोबर वाहून जात असून, दरवाजे पुन्हा बंद केल्यानंतर 100 टक्के जीवंत पाणीसाठा बॅरेजमध्ये जमा होणार आहे.
धरण विभागाचे अभियंता हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, पावसाळ्यात हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. ते पाणी जळगाव जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमार्गे शेवटी अरबी समुद्रात मिळते. याच प्रवाहात शेळगाव बॅरेजची निर्मिती करण्यात आल्याने जिल्ह्यातील पाणी साठवण क्षमतेत समाधानकारक भर पडली आहे.