

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या आठ ते दहा दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकूण ८८१ गावे बाधित झाली असून २,०९,२७३ शेतकरी बाधित झाले आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १,६४,५५१.७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
सोयाबीन, मका, ज्वारी-बाजरी, कापूस, कांदा, भाजीपाला, तूर, ऊस, केळी आणि विविध फळपिकांचे आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव, रावेर, भडगाव, एरंडोल, भुसावळ, पारोळा, चाळीसगाव, बोदवड, धरणगाव आणि यावल या तालुक्यांमध्ये पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
सप्टेंबरमधील अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १.६४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून हक्काचा घास हिरावला गेला आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान
१५-१६ सप्टेंबर : ११,३७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ७७ गावे बाधित.
१७ सप्टेंबर : ९३.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान, रावेर तालुक्यात ६ गावे बाधित.
२१-२३ सप्टेंबर : ६५,४७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ३७८ गावे बाधित.
२३ सप्टेंबर : ३,८८८.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २७ गावे बाधित.
२७-२८ सप्टेंबर : ८३,७२४.४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ३२३ गावे बाधित.