

जळगाव : एमआयडीसी परिसरातील धाडसी चोरी प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरीचा मास्टरमाइंड गोडाऊनमध्ये मागील 10 वर्षांपासून काम करणारा कर्मचारी असल्याचे उघडकीस आले आहे.
एमआयडीसी परिसरातील अतुल मुळे यांच्या मालकीच्या गोडाऊनमधून 8 लाख 35 हजार रुपये किमतीच्या पापड मसाल्याच्या 71 गोण्या आणि दोन इको वाहन चोरीला गेल्या होत्या. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गोडाऊनमधील चालक अनिल पाटीलने आपल्या साथीदारांसह ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी अनिल पाटील, बाबुराव सुरवाडे, शिवा पाटील आणि राहुल बाविस्कर यांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केवळ 48 तासांत गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.