

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने तिच्या सख्ख्या चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी परमानंद कन्हैयालाल गोरे वय २६, रा. दुलई, ता. खालवा, जि. खंडवा, मध्यप्रदेश याला दोषी ठरवत न्यायालयाने २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
पीडित मुलगी व तिचे कुटुंब मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असून उपजीविकेसाठी भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात वास्तव्यास होते. पीडितेचे वडील आणि काका एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होते. १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता पीडित मुलगी आरोपीच्या घरी खेळण्यासाठी गेली असता, आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.घरी परतल्यानंतर मुलीने रडत आईला घडलेला प्रकार सांगितला. रात्री वडील घरी आल्यानंतर त्यांनाही ही माहिती देण्यात आली. वडिलांनी आरोपीला जाब विचारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपी फरार झाला. पीडितेच्या आजोबांची प्रकृती बिघडणे आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीमुळे फिर्याद देण्यास विलंब झाला. त्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये पीडितेची आई, सरकारी पंच राधिका गोपाळ ढाके, पीडिता, डॉ. अनिता धुर्वे, डॉ. श्रावणी हुंबे, एपीआय रूपाली चव्हाण आणि तपास अधिकारी (सेवानिवृत्त) पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडली. त्यानंतर सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ तसेच पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवून पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तसेच दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचेही न्यायालयाने आदेश दिले.
या प्रकरणात पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील आणि केस वॉच पोलीस निरीक्षक गुणवंत सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.