Jalgaon Crime : जळगावात 15 लाखाच्या दोन घरफोड्या
जळगाव : तालुक्यातील आव्हाने शिवार आणि शहरातील बालाजी पेठ येथे दोन घरफोड्या होऊन 15 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पहिली घटना आव्हाने शिवारातील सत्यम पार्क, प्लॉट क्रमांक 42 येथे घडली. सुरेश भागवत जगताप हे दसऱ्यानिमित्त मुलीला भेटण्यासाठी महाबळ येथे गेले होते. त्यानंतर रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले असताना त्यांच्या घरी चोरट्यांनी संधी साधली. घरी परतल्यावर मुख्य दरवाजा उघडा दिसल्याने संशय येऊन तपास केला असता त्यांना घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला असल्याचे आढळले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील पुढील तपास करीत आहेत.
चोरांनी लूटले असली सोने
दरम्यान दुसरी घटना शुक्रवार (दि.3) रोजी शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स दुकानात घडली. दसऱ्याच्या दिवशी गुरुवार (दि.2) रोजी पहाटे अडीच ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून प्रवेश केला. कारागीर सुदर्शन माल यांच्या लाकडी ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातून 124 ग्रॅम सोन्याची लगडी व शुद्ध सोन्याचा तुकडा असा एकूण 13 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
या प्रकरणी दुकानमालक निखिल गौड (रा. समृद्धी अपार्टमेंट, सिविंग दूध फेडरेशन जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विश्वजीत बनेश्वर सारमल (रा. शनिपेठ, जळगाव; मूळगाव जयनगर, पश्चिम मोदणिपूर, पश्चिम बंगाल) याच्या विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या दोन्ही घटनांमुळे जळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

