

जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी एका ग्रामपंचायतीच्या सरपंचासह दोन जणांनी ठेकेदाराकडून लाच मागितल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना अटक केली आहे. ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत अंदाजे १ कोटी ५० लाख रुपयांचे नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले होते. त्या कामाचे उर्वरित देयक मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद जळगाव येथे प्रस्ताव सादर केला होता. मात्र ग्रामपंचायत सरपंच भानुदास मते यांनी हस्तांतर करारनामा करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
तक्रार पडताळणीदरम्यान सरपंच भानुदास मते व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पती समाधान महाजन यांनी ८० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरवले. त्यानुसार काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सापळा रचण्यात आला. यादरम्यान आरोपी भानुदास मते व समाधान महाजन यांनी खाजगी इसम संतोष पाटील यांच्या मार्फत ८० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने तिघांनाही रंगेहात पकडले.
या प्रकरणी सरपंच भानुदास पुंडलिक मते (वय ४४), समाधान काशिनाथ महाजन (वय ३८), व संतोष नाथचू पाटील (वय ४९) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी पार पाडली.