

जळगाव : गुजरातमधील बारडोलीनजीक उकाई डाव्या कालव्यात फेकून दिल्याने मृत्यू झालेल्या एरंडोल येथील पाटील कुटुंबातील नितीन उर्फ भैय्या (नितेश) हिंमत पाटील आणि कविता संजय पाटील या दोघांचा धक्कादायक पूर्वइतिहास समोर आला आहे. बनावट अपघात दाखवून विमा कंपनीला १० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी या दोघांसह पाच जणांवर गेल्याच आठवड्यात (१९ नोव्हेंबर रोजी) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक संदीप गावीत यांनी दिली आहे.
काय आहे नेमके बोगस विमा प्रकरण?
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे सल्लागार अर्शद शेख (वय ४३, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी मेहुणबारे पोलिसांत फिर्याद दिली होती. ९ जून २०२५ रोजी रात्री जामदा शेतशिवारात (ता. चाळीसगाव) अपघात झाल्याचा बनाव रचून मेहुणबारे पोलिसांत गुन्हा (र.नं. १३९/२०२६) दाखल करण्यात आला होता. या आधारे मयताची पत्नी कविता संजय पाटील हिने ५० लाख रुपयांचा विमा दावा दाखल केला होता. मात्र, कंपनीच्या अंतर्गत चौकशीत या प्रकरणातील तफावत उघडकीस आली.
चौकशीत फुटले बिंग; पोलिसाचीही संशयास्पद भूमिका
विमा कंपनीने केलेल्या पडताळणीत पोस्टमार्टम रिपोर्टमधील कॉलम क्र. ९ मध्ये मयताची कोणतीही हकीगत नमूद नसल्याचे, तसेच कथित अपघातातील चालक व साक्षीदार बोगस असल्याचे समोर आले. साक्षीदार बापू दगा पाटील याने आपल्याला या घटनेची काहीच माहिती नसल्याचे सांगितले, तर प्रेमचंद पाटील याने नात्याबाबत खोटी माहिती दिली होती. चौकशी सुरू होताच कविता पाटील हिने ५० लाखांचा दावा मागे घेतला, मात्र तत्पूर्वीच येस बँक डेबिट कार्डवरील पॉलिसीचे १० लाख रुपये लाटून कंपनीची फसवणूक केली होती. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नितेश हिंमत पाटील (रा. एरंडोल), आकाश सुनील पाटील (रा. जुवाडी, ता. भडगाव), प्रेमचंद त्र्यंबक पाटील (रा. एरंडोल), कविता संजय पाटील (रा. एरंडोल) आणि तत्कालीन तपासी अंमलदार यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३१८(४), ६१(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. परिविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिले या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
गुजरात हत्याकांडाशी धागेदोरे जुळण्याची शक्यता
एका बाजूला मेहुणबारे पोलिसांत १० लाखांच्या विमा फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटत नाही, तोच गुजरातमधील बारडोली (जि. सुरत) येथील उवा गावाजवळ उकाई कालव्यात फेकून दिल्याने नितीन हिंमत पाटील आणि कविता संजय पाटील यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनीही पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली आहे. या बोगस विमा प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण किंवा वादातूनच गुजरातमध्ये या कुटुंबाचा काटा काढला गेला का, या दिशेने आता तपास यंत्रणांची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.