

जळगाव : शेतीचा मुख्य आधार असलेले ट्रॅक्टर चोरून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एरंडोल परिसरातील दोन गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी सव्वातीन लाखांचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. या कारवाईत विखरण येथील विकी देवरे याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला जेरबंद करण्यात आले असून, फरार असलेल्या इतर दोन साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. एकापाठोपाठ दोन ट्रॅक्टर चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि 'नेटवर्क'च्या माध्यमातून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पथकाने एरंडोल तालुक्यातील विखरण येथील संशयित विकी देवरे आणि एका बालकाला ताब्यात घेतले.
तपासात धक्कादायक बाब समोर आली की, या चोरीत गणेश भिकन गोसावी आणि प्रवीण भाईदास कोळी (दोघे रा. विखरण) यांचाही सहभाग होता. पोलिसांनी सध्या ३,२५,००० रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. मात्र, गणेश गोसावी आणि प्रवीण कोळी हे सध्या फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पीएसआय जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील, राहुल कोळी, महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार, बाबासाहेब पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.