Jalgaon Crime|चोरट्यांचा हैदोस! बंद घरे अन् गर्दीच्या बसस्थानकावर डल्ला; एकाच दिवसात लाखो रुपयांचा ऐवज लंपास

Jalgaon Theft Spree: Lakhs Stolen in One Day- फत्तेपूर, जळगाव एमआयडीसी, चाळीसगाव आणि मुक्ताईनगरमध्ये चोऱ्यांचे सत्र; खाकीची गस्त केवळ कागदावरच?
theft
theftPudhari
Published on: 
Updated on: 

जळगाव: सणासुदीच्या दिवसांत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांचे फावले असून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बंद घरांना लक्ष्य करण्यासोबतच प्रवाशांच्या अंगावरील दागिने लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. फत्तेपूर, जळगाव शहर (एमआयडीसी), चाळीसगाव आणि मुक्ताईनगर अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्यांची नोंद झाली आहे. या घटनांमध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच दिवसात दाखल झालेल्या या गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या रात्रीच्या व दिवसाच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फत्तेपूर: डॉक्टरांचे वडिलोपार्जित घर फोडले; ७६ हजारांचा ऐवज लंपास

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोद्री येथे डॉक्टरचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीसह रोख रकमेवर डल्ला मारला. फिर्यादी डॉ. राजेश डोंगरसींग नाईक (वय ४२, रा. इंदिराबाई ललवाणी नगर, जामनेर) यांचे गोद्री येथे वडिलोपार्जित घर आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री १० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

४० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (१० ग्रॅम), ८ हजारांच्या दोन सोन्याच्या नथ (२ ग्रॅम), ८ हजार रुपये किमतीची चांदीची पैंजण जोड आणि २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फत्तेपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक फौजदार प्रवीण चौधरी करत आहेत.

जळगाव एमआयडीसी: वृद्धाच्या घरात जिण्यावाटे घुसून डल्ला

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढाके वाडी परिसरात भरवस्तीत जिण्याच्या दरवाज्यातून घरात शिरून चोरट्याने चोरी केली. चंद्रकांत द्वारकानाथ पाटील (वय ७४, रा. प्लॉट नं. ११/२, ढाके वाडी, श्रीकृष्ण मंदिराजवळ, जळगाव) हे ३ ऑक्टोबरच्या रात्री घरात झोपलेले असताना मध्यरात्री ते पहाटे पावणेसातच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जिण्यातील उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश केला.

फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील १० हजार रुपये रोख, पत्नीच्या कापडी पिशवीतील ५० व १०० रुपयांच्या नोटा असलेले ६ हजार रुपये आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण २१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी पुढील तपास करत आहेत.

चाळीसगाव बसस्थानक: बसमध्ये चढताना महिलेच्या हातातील बांगडी गायब!

चाळीसगाव शहर बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केली. मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथील खासगी शिक्षिका धनश्री संदेश महाजन (वय ४४) या २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सासू नलिनी महाजन यांच्यासह चाळीसगाव ते ठाणे बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दी आणि रेटारेटीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने सासूच्या उजव्या हातातील ६० हजार रुपये किमतींची २० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी शिताफीने चोरून नेली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाटील तपास करीत आहेत.

मुक्ताईनगर: सुरक्षा रक्षकाचे घर भरदिवसा लुटले; सव्वालाखाचे सोने पळवले

मुक्ताईनगर शहरातील रोहिदास नगरात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली असून चोरट्यांनी घरातून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचे दागिने पळवले. फिर्यादी फैजल खान फिरोज खान (वय ३०, व्यवसाय: सिक्युरिटी गार्ड) यांच्या रोहिदास नगरातील घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधत ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील ९० हजार रुपये किमतीचा ३ तोळे वजनाचा सोन्याचा हार आणि ३० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या पोती (प्रत्येकी ५ ग्रॅम), असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हेडकॉन्स्टेबल गणेश लाटे तपास करत आहेत.

theft
Jalgaon Crime | बँकेतून रेकी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला राजगडमधून ठोकल्या बेड्या

एकाच दिवशी ग्रामीण भागापासून ते जिल्हा मुख्यालयापर्यंत चार ठिकाणी चोऱ्या उघडकीस आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंद घरे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवून सराईत टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

theft
Jalgaon Crime | कमरेला देशी कट्टा खोचून फिरणारा किनगावचा तरुण गजाआड!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news