रावेर, चाळीसगाव अन् एमआयडीसी भागात चोऱ्यांचे सत्र

Jalgaon News| लाखांचा ऐवज चोरीला गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रावेरमध्ये ७० वर्षीय वृद्धेला मारहाण करत दागिने ओरबाडण्यापासून ते चाळीसगावच्या भरगच्च बसस्थानकावर महिलेचे मंगळसूत्र लांबवण्यापर्यंत चोरट्यांचे धाडस वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या वेगवेगळ्या चार घटनांमध्ये लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

७० वर्षीय आजींना लुटले; नाका-कानातले दागिने ओरबाडले

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे खुर्द येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सखुबाई सोमा सोनवणे (वय ७०) या वृद्धेच्या घरात रात्रीच्या सुमारास २ ते ३ अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश केला. या नराधमांनी वृद्धेला धमकावत त्यांच्या अंगावरील सोन्याचे कानातले, नाकातील दागिने आणि पाकिटातील रोख रक्कम असा एकूण ३२,०००/- रुपयांचा ऐवज बळजबरीने ओरबाडून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

चाळीसगाव: गर्दीचा फायदा घेत भरदिवसा चैन स्नॅचिंग

चाळीसगाव बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. काकळणे येथील रहिवासी प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९) या पारोळा जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हातोहात लांबवले. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

रावेर: घरासमोरून दुचाकी लंपास

रावेर शहरातील निगझिरी मोहल्ला येथून घरासमोर उभी केलेली हिरो कंपनीची काळी मोटारसायकल क्रमांक एम पी -10 एन डी -6036 अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. सुरेश प्यारासिंग गंगावणे (राहणार मांडवा भट्टी, जि. खरगोन, म.प्र.) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून ५०,०००/- रुपये किमतीची ही दुचाकी चोरीला गेल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

एमआयडीसी परिसर: आता शेतकरीही असुरक्षित; कॉपर वायरवर डल्ला

चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतीपंपांकडे वळवला आहे. शिरसोली प्रबो शिवारातील शेत गट क्र. ३३१ मधील लक्ष्मण देविदास बारी यांच्या विहिरीसह शेजारील विष्णू भंगाळे, शरद बारी आणि श्रीकृष्ण बारी यांच्या शेतातील सोलर व इलेक्ट्रिक पंपाच्या कॉपर वायर रात्रीच्या वेळी कापून नेल्या. साधारण १०,१००/- रुपयांच्या या वायर्स चोरीला गेल्या असून, भर उन्हाळ्यात सिंचनाचे संकट उभे राहिल्याने बळीराजा संताप व्यक्त करत आहे.

खाकीचा धाक संपला का ?

एकीकडे पोलीस गस्त घालत असल्याचा दावा करत असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यात एकामागून एक घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news