

जळगाव : जिल्ह्यात गेल्या साडेआठ वर्षांत १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या अपहरणाच्या आणि पळून जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१८ पासून ते जून २०२६ पर्यंत जिल्ह्यातून तब्बल २,०२७ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
मात्र, या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत जळगाव जिल्हा पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी रात्रीचा दिवस करत यातील १,९२८ मुला-मुलींचा यशस्वी शोध लावून त्यांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या या 'ॲक्शन मोड'मुळे तब्बल ९५.११ टक्के मुले परत मिळाली असली, तरी अद्याप ९९ जण बेपत्ता असल्याने पालकांची धाकधूक कायम आहे.
पोलीस रेकॉर्डमधील अधिकृत आकडेवारीवर नजर टाकल्यास, अपहरण होणाऱ्या किंवा पळून जाणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कैक पटीने जास्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण २,०२७ अपहरणांच्या प्रकरणांमध्ये २९४ मुले आणि तब्बल १,७३३ मुलींचा समावेश आहे. यापैकी पोलिसांनी शोध घेतलेल्या १,९२८ जणांमध्ये २९० मुले आणि १,६३८ मुलींना शोधण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही शोध न लागलेल्या ९९ जणांमध्ये ४ मुले आणि ९५ मुली असून, हा आकडा यंत्रणेची चिंता वाढवणारा आहे.
जिल्ह्यातील अपहरणाचा हा आलेख वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहे. २०१८ मध्ये अपहरणाची एकूण संख्या १६४ होती, ती २०२४ मध्ये थेट ३०७ वर पोहोचली आणि २०२५ मध्येही हा आकडा ३०७ वर कायम राहिला. चालू वर्षात म्हणजेच जून २०२६ पर्यंत, अवघ्या पहिल्या सहा महिन्यांतच २२५ मुला-मुलींचे अपहरण झाले आहे. या वाढत्या आकडेवारीवरून दरवर्षी हे प्रमाण किती वेगाने वाढत आहे, याची प्रचिती येते.
जळगाव पोलिसांनी ९५.११ टक्के कामगिरी यशस्वी बजावून परिस्थितीला सडेतोड उत्तर दिले आहे, यात शंकाच नाही. परंतु, अद्याप ९९ मुले-मुली नेमकी कुठे आहेत, हा मोठा कायम आहे. विशेषतः यात ९५ अल्पवयीन मुलींचा समावेश असून, त्यांचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. जळगाव पोलिसांचे 'मिसिंग सेल' या उर्वरित बेपत्ता मुलांचा शोध घेऊन जळगाव जिल्ह्याला १०० टक्के सुरक्षित करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.