

जळगाव : रावेर शहरातील वार्षिक रथयात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोरी करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, या कारवाईनंतर गर्दीत होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
शनिवार (दि.6) रोजी रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी पल्लवी विशाल पाटील, (रा. शिवाजी चौक) या गुरुवार (दि.4) रोजी रथयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांची दीड ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरीस गेली. त्याच सुमारास राजश्री चौधरी आणि रोहिणी भिडे यांच्या सोनसाखळ्याही चोरीस गेल्याचे समोर आले. तिन्ही महिलांनी मिळून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.
त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु गर्दीमुळे संशयितेचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांनी काढलेले मोबाईल व्हिडीओ आणि फोटो तपासले. यातील एका व्हिडीओमध्ये संशयित महिलेचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला.
या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी यात्रेच्या परिसरात शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर ही महिला संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळली. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता युवतीने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेला मुद्देमाल परत केला. अटक केलेली आरोपी संजना रोहेल शिंदे (वय 20, रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना) सध्या भोईसर, जि. ठाणे. येथे राहत आहे. तिच्याकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे डॉ. विशाल जयस्वाल, मिरा देशमुख आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध लावला. पुढील तपास मिरा देशमुख करत आहेत.