

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील हातगाव, अंधारी, रोहीणी तसेच नांदगाव (जि. नाशिक) परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याच्या मोटारी चोरी करून त्या स्वतःच्या असल्याचे सांगून विकणाऱ्या तसेच मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. चोरट्ट्यांकडून एक मोटारसायकल आणि तब्बल 29 पाणबुडी मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांत दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करण्यात आला.
या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित आरोपी सोमनाथ उर्फ लंगडया रघुनाथ निकम (रा. अंधारी, ता. चाळीसगाव), सुधीर नाना निकम (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) आणि सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
चोरीच्या पाणबुडी मोटारी स्वत:च्या सांगून विक्री
सखोल चौकशीत आरोपींनी शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरी करून त्या स्वतःच्या असल्याचे सांगून विकल्याचेही उघड केले. त्यांच्या माहितीनुसार सुरुवातीला 11 पाणबुडी मोटारी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देऊन न्यायालयीन कोठडी मिळवून आणखी तपास केला असता, आणखी 18 पाणबुडी मोटारी हस्तगत करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण 1 चोरीची मोटारसायकल आणि 29 पाणबुडी मोटारी आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड (चाळीसगाव उपविभाग) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, महेश पाटील, भुषण शेलार, सागर पाटील, बाबासाहेब पाटील तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्मचारी युवराज नाईक, गणेश चव्हाण, दिपक नरवाडे, संदिप पाटील, तुकाराम चव्हाण आणि विजय पाटील यांच्या पथकाकडून ही कारवाई पार पाडली.