

जळगाव : प्रेमसंबंधातून एका ३४ वर्षीय तरुणास सातत्याने मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीने फिर्याद दिली असून आरोपींनी खोट्या तक्रारींची धमकी देत आर्थिक उकळपट्टी केल्याचा तसेच सातत्याने मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील मोहोडी येथील राजेंद्र तायडे (वय 34) यांचे जळगाव शहरातील वाघ नगर परिसरातील एका महिलेसोबत मागील सुमारे सहा महिन्यांपासून प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर आरोपींनी संगनमताने राजेंद्र तायडे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देत त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच त्यांना वारंवार मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याच मानसिक छळाला कंटाळून २८ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राजेंद्र तायडे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ४ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, दुखापत करणे तसेच सामूहिक हेतूने गुन्हा केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील करीत आहे.