

जळगाव : जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित खासगी रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयातील एका ३० वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉ. संदीप भारुडे आणि डॉ. प्रीती भारुडे या दाम्पत्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित परिचारिका संबंधित हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना २१ जुलै २०२५ पासून डॉ. संदीप अशोक भारुडे याने तिच्यावर वाईट नजर ठेवली होती. जवळीक साधण्याच्या उद्देशाने डॉक्टरने वारंवार तिची छेड काढली. इतकेच नव्हे तर, हॉस्पिटलमध्येच तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे करून तिचा सतत पाठलाग केला. डॉक्टरांच्या या विकृत कृत्यामुळे पीडित महिला प्रचंड तणावाखाली होती.
पीडितेने जेव्हा या कृत्याला कडाडून विरोध केला, तेव्हा डॉ. संदीप यांची पत्नी डॉ. प्रीती भारुडे यांनी पतीला समज देण्याऐवजी उलट पीडितेचीच मुस्कटदाबी केली. "जर याबाबत कोणालाही काही सांगितले, तर तुझ्या पतीला आणि मुलांना औषध देऊन जीवे मारून टाकू," अशी धक्कादायक आणि गंभीर धमकी डॉ. प्रीती यांनी पीडितेला दिली.
सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य झाल्याने अखेर पीडित परिचारिकेने २१ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार भारती देशमुख करत आहेत.