

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हा घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी बियरची बाटली देखील मिळून आली असून, हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखल्या जाणाऱ्या पद्मालय परिसरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात गुरुवारी एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तिचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक विनायक कोते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासाला गती देण्यासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरील नमुने गोळा केले असून महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
मृतदेह आढळलेल्या ठिकाणाजवळ पोलिसांना बियरची एक रिकामी बाटली आणि इतर काही संशयास्पद वस्तू मिळाल्या आहेत. यावरून संबंधित महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. मयत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, गुन्हेगारांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे कृत्य केल्याचे दिसून येते.
पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला आहे. संबंधित महिला नेमकी कुठली आहे? तिचा खून कोणी आणि का केला? याबाबत अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र, दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलीस उपअधीक्षक विनायक कोते यांनी व्यक्त केला आहे.
"पद्मालय परिसरातील जंगलात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. फॉरेन्सिक आणि इतर तांत्रिक गोष्टींच्या आधारे तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल."
— विनायक कोते (पोलीस उपअधीक्षक)