

जळगाव : न्यायालयाने दिलेल्या २० हजार रुपयांच्या पोटगीचा राग मनात धरून, स्वतःच्याच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पतीचा कट जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उधळून लावला आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे घडलेल्या या खळबळजनक जाळपोळ प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मुख्य सूत्रधार पतीसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या तपासादरम्यान ९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात एलसीबीला यश आले आहे.
नगरदेवळा येथील फिर्यादी किरण उमेश राऊळ आणि त्यांचे पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) यांच्यात गेल्या काही काळापासून न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने राहुल पाटील याला दरमहा २० हजार रुपये पोटगी (खावटी) देण्याचे आदेश दिले होते. दरमहा खिशातून जाणारे पैसे आणि पत्नीवरील राग यामुळे राहुलने तिचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला २ लाख रुपयांची सुपारी दिली आणि १ लाख रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) दिले.
ठरलेल्या कटानुसार, आरोपी गणेश पाटील आणि समाधान निकम यांनी मध्यरात्री किरण राऊळ यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली. घरात फिर्यादी आणि त्यांची आई झोपलेल्या असताना हा भीषण प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एलसीबीला समांतर तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गणेश पाटील याला ताब्यात घेतले. त्याने पोपटासारखी सर्व हकिकत सांगितली आणि या संपूर्ण कटाचा सूत्रधार राहुल पाटील असल्याचे उघड झाले.
मुख्य आरोपी गणेश पाटील याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो केवळ सुपारीबाज नसून सराईत दुचाकी चोर असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून जळगाव, जालना, संभाजीनगर आणि थेट गुजरात राज्यातील सुरत येथून चोरलेल्या तब्बल ९ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रमुख राहुल गायकवाड, पीएसआय शेखर डोमाळे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, हेमंत पाटील, रतन गिते, जितू पाटील, ईश्वर पाटील, राहुल महाजन, सचिन घुगे, बाबासाहेब पाटील, दिनेश पाटील आणि सायबर सेलचे मिलिंद जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.