

जळगाव : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना शासनाच्या विविध योजना, प्रकल्प यांचा आढावा घेण्यासाठी विभाग व कार्यालय निहाय गुगल स्प्रेडशीट तयार करणेत आलेले असून सर्व ८८ विभाग प्रमुखांच्या अखत्यारितील विभागांचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विभाग व कार्यालयनिहाय घेतला. संबंधित विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांचा प्रत्येकी अर्धा तास याप्रमाणे आढावा घेण्यात आला. यामध्ये मंत्रालय स्तरापासून ते विभाग स्तरावर प्रलंबित असलेल्या कामाचा, सुरु असलेल्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध विकासकामांची गती वाढून गुणवत्तापूर्ण कामकाज होईल, याची या माध्यमातून दक्षता घेतली जाईल.
जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय विभागातील अधिकारी यांना संबंधित यंत्रणेबाबत दूरध्वनीवरुन संपर्क करून प्रलंबित कामाबाबत विचारणा केली. त्याकरीता पाठपुराव्यासाठी एक डेस्क तयार करण्यात आला आहे. त्यावरुन कामाबाबत पुढील पाठपुरावा केला जाणार आहे. या यंत्रणेमुळे कामाला गती आल्याने यापुढे कोणतेही काम खोळंबणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे संबंधित कामे ही गुगल स्प्रेडशीट मुळे सविस्तर कळणार असून संबंधित प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहणार आहे. विभागाकडून माहिती भरण्यास विलंब झाल्यास संबंधित डेस्क त्यावर विचारणा करून ती माहिती भरायला लावायला सांगणार आहे.
जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून जे प्रकल्प सुरु आहेत. त्या प्रत्येक प्रकल्पाला जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील समुहाने प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर भेटी देऊन कामाबाबत माहिती जतन करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे कामातील त्रुटी विचारात घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला जाणार आहे. याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतल्यामुळे प्रकल्प गतीस चालना मिळाली आहे.
जिल्ह्यातील सर्व 88 विभागांना त्यांच्या संबंधित असलेल्या विषयाची स्प्रेडशीट मुद्दे व विषयनिहाय देण्यात आलेले आहे. ही स्प्रेडशीट संबंधित विभागाकडून भरल्यामुळे एकमेकांच्या संबंधित कामांबाबत विचारणा करणार असल्याने संबंधित विभागाला समन्वय करणे सोपे झाले आहे. यापुढे ही नियमित प्रकिया असणार आहे.