

Jalgaon Collector Office Electricity Wastage
जळगाव : जळगाव शहरात उष्णतेची तीव्र लाट असून तापमान ४१.८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘संजय गांधी निराधार योजना’ विभागात विजेच्या अपव्ययाचा प्रकार उघडकीस आला आहे.
या विभागातील तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या केबिनमध्ये त्या अनुपस्थित असतानाही कुलर सुरू ठेवण्यात आल्याचे आढळले. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नसतानाही उपकरणे सुरू असल्यामुळे अनावश्यकपणे वीज वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या शहरात उष्णतेमुळे नागरिक पाणी व सावलीच्या शोधात भटकत आहेत. अशा वेळी शासकीय कार्यालयात रिकाम्या केबिनसाठी कुलर सुरू ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे वीज बचतीबाबत जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे सरकारी कार्यालयातच विजेचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित का होते आणि उपकरणे सुरू ठेवण्यामागे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक निधीचा अशा प्रकारे वापर करणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.