

जळगाव : शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रात रासायनिक कारखान्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात आहे. परिणामी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, याची जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत मात्र एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. नागरिकांना या प्रदूषणाचा मोठा त्रास होत असून, प्रशासन त्यावर ठोस उपाययोजना करत नसल्याचे समोर आले आहे.
एमआयडीसी भागातील रासायनिक कारखान्यांमधून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी बेजाबदारपणे उघड्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. हे पाणी खेडी व नागरी वस्त्यांमधून वाहत असून, मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण व पर्यावरणीय धोका निर्माण करत आहेत. एमआयडीसीने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याप्रकरणी एमआयडीसीला लेखी पत्र पाठवून सार्वजनिक सुविधा आणि सांडपाणी व्यवस्थापनाबाबत उपाययोजना करण्यास सांगितले आहे. अद्याप एमआयडीसीने मात्र याबाबाबत कोणत्याही आवश्यक सुविधा पुरवलेल्या नाहीत.
एमआयडीसी भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र बंदिस्त भूमिगत गटारे, त्यावर प्रक्रिया संयंत्र आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नसल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी असुरक्षित पद्धतीने नदी व उघड्या गटारांमध्ये सोडले जात आहे. काही कारखाने रात्रीच्या वेळी औद्योगिक सांडपाणीही गटारांमध्ये सोडत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
एमआयडीसीमध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र नसल्याने, हे सांडपाणी रहिवासी भागातून वाहून नेले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी करण सिंग राजपूत यांनी एमआयडीसी प्रशासनाला मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, नियमांनुसार घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवली जावी व योग्य वैज्ञानिक पद्धतीने प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबवायला हव्यात.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन दोषी कारखान्यांची तपासणी केली असून, पाण्याचे नमुने घेऊन दोषींवर कारवाई केली जात आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अद्याप नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.