

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी अलीकडे पाचोरा, भडगाव व जळगाव तालुक्यांचा दौरा करून विविध शासकीय कार्यालयांना अचानक भेटी दिल्या. या पाहणी दौऱ्यात अनेक ठिकाणी कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.
शिरसोली येथील आरोग्य उपकेंद्रात पाहणी दरम्यान आरोग्य सेविका व मदतनीस हे दोघेही अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला असून, त्यांचे एक दिवसाचे वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच, पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या भेटीदरम्यान एका शिक्षकाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजेरी लावल्याचे आढळले. याबाबत संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्याचेही एक दिवसाचे वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दौऱ्यात करनवाल यांनी पाचोरा तालुक्यातील लसगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शालेय सुविधा यांची माहिती घेतली. त्यानंतर बांबूरुड येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी करताना तेथील औषध साठा, कर्मचारी उपस्थिती आणि सुविधा यांचा आढावा घेतला.
दौऱ्याच्या अखेरीस सीईओ करनवाल यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेचे भान ठेवण्याचे, नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आणि प्रशासनात शिस्त व कार्यक्षमतेचा अवलंब करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.