

जळगावः चोपडा शहर पोलिसांनी शिरपूर बायपास रोडवर मध्यरात्री मोठी आणि धाडसी कारवाई करत, घातक आणि प्राणघातक शस्त्रे घेऊन रस्तालुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत आरोपींना अटक केली आहे. पकडलेले आरोपी हे नांदेड आणि संभाजीनगर (वैजापूर) येथील नामचीन गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी आणि अग्निशस्त्रे बाळगणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत.
अशी झाली कारवाई:
दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, शिरपूर बायपास रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही संशयीत इसम बराच वेळ थांबलेले आहेत.
या माहितीवरून तात्काळ पोलीस पथक तयार करण्यात आले. पथकाने रणगाडा चौकाच्या पुढे, बायपास रोडच्या बाजूला थांबलेल्या MH २६ CH १७३३ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारचा शोध घेतला. यावेळी कारच्या बाहेर दोघे जण पहारा देत उभे होते आणि पाच जण आत बसलेले होते, असे एकूण सात संशयीत आरोपी आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस पथकाने तात्काळ घेराव घालून या सातही आरोपींना ताब्यात घेतले.
घातक शस्त्रसाठा जप्त:
पोलिसांनी आरोपींची आणि त्यांच्या कारची झडती घेतली असता, त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये: दोन आरोपींच्या कमरेला लोड केलेले (काडतूस भरलेले) दोन गावठी कट्टे (पिस्टल) मिळून आले. गाडीत दोन धारदार तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन (Magazine) देखील सापडले. याशिवाय आरोपींचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूण १३ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल (गाडी, शस्त्रे, मोबाईल, रोख) जप्त करण्यात आला आहे.
धोकादायक आरोपींची नावे :
दिलीपसिंघ हरीसिंघ पवार (वय ३२, रा. नांदेड)
विक्रम उर्फ विकी बाळासाहेब बोरगे (वय २४, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर)
अनिकेत बालाजी सुर्यवंशी (वय २५, रा. नांदेड)
अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड (वय २५, रा. नांदेड)
सद्दामहुसेन मोहंम्मद अमीन (वय ३३, रा. नांदेड)
अक्षय रविंद्र महाले (वय ३०, रा. भावसार गल्ली, चोपडा, जि. जळगाव)
जयेश राजेंद्र महाजन (वय ३०, रा. भाटगल्ली, चोपडा, जि. जळगाव)
अत्यंत धोकादायक गुन्हेगारी पार्श्वभूमी:
त्यापैकी दिलीपसिंघ पवार आणि अनिकेत सुर्यवंशी यांच्यावर नांदेडमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म ॲक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिलीपसिंघ याच्यावर खुनाच्या गुन्ह्यांसह एकूण ७ गुन्हे नांदेड येथे दाखल आहेत.
विक्रम उर्फ विकी बोरगे हा वैजापूर (जि. संभाजीनगर) येथील दरोडा व आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात फरार होता. दोन आरोपी नुकतेच महाराष्ट्र धोकादायक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम (MPDA) कायद्यान्वयेच्या स्थानबद्धतेतून कारागृहातून बाहेर आलेले आहेत. चोपड्याच्या आरोपींपैकी अक्षय महाले याच्यावर यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणे आणि दंगल केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
नांदेडमध्ये दहशत, खंडणी आणि छळ:
तपासात उघड झाले आहे की, नांदेड येथे या आरोपींची मोठी दहशत आहे. ते शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसुल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे, लोकांना विवस्त्र करून त्यांचा छळ करणे आणि त्याचे व्हिडीओ तयार करून इतरांना घाबरवणे अशी कृत्ये करत होते. याबद्दल सखोल तपास सुरू आहे.
गुन्हा दाखल:
या सातही आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम ३१० (४) (५) (दरोड्याची तयारी), शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ४/२५ सह महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक . महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी . अण्णासाहेब घोलप (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह तपास पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.