

जळगाव : शहर महानगरपालिकेत 'आमची सत्ता-आमचा महापौर' अशा आविर्भावात वावरणाऱ्या भाजपला आज त्यांच्याच नगरसेवकांनी आरसा दाखवला. शहरातील आयटीआय परिसरातील कचरा डेपोच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या सोबतीने चक्क भाजपच्याच विद्यमान नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर 'ठिय्या' मांडला. सत्तेत असूनही आपल्याच प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी स्वपक्षीय नगरसेवकांना रस्त्यावर उतरावे लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या अनेक दिवसांपासून आयटीआय जवळील कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधी आणि पसरणाऱ्या आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी महापालिका गाठली. या आंदोलनाचे विशेष म्हणजे, यात भाजपचे नगरसेवकही अग्रभागी होते. यामुळे 'प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक उरला नाही की काय?' असा सवाल उपस्थित होत आहे.
अर्धा तास रस्ता जाम
आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडल्याने आणि रस्ता रोखून धरल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. तब्बल अर्धा तास हा गदारोळ सुरू होता. "कचरा डेपो हटवा, अन्यथा खुर्च्या खाली करा," अशा घोषणांनी मनपा परिसर दणाणून गेला होता. आपल्याच नगरसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने मनपातील सत्ताधाऱ्यांची मोठी पंचाईत झाली.
महापौरांकडून आश्वासनांची मलमपट्टी
आंदोलनाची तीव्रता आणि स्वकीयांचाच रोष पाहून अखेर महापौर, उपमहापौर आणि मनपा आयुक्त यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी नगरसेवकांनी प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले. महापौरांनी आणि आयुक्तांनी तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याचे आणि कचरा डेपोच्या नियोजनाबाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असले, तरी भाजपच्या नगरसेवकांनी दिलेला हा 'घरचा आहेर' जळगावात चर्चेचा हॉट टॉपिक ठरला आहे.
राजकीय वर्तुळात खमंग चर्चा
महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आणि महापौर असतानाही त्यांच्याच नगरसेवकांना आंदोलनाची वेळ का येते? हा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जात आहे. प्रशासनावर पकड नसल्याचे हे लक्षण आहे की अंतर्गत गटबाजीचा परिणाम, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.