

जळगाव : रावेर ते सावदा रस्त्यावर गस्त करीत असताना अवैध वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 26 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या MH -04 FJ 3248 या क्रमांकाच्या मालवाहतूक वाहनाची तपासणी केली असता त्यात सागवान लाकडाचे पलंग चार नग व एक सोफासेट मिळून आले आहेत.
या प्राप्त माला विषयी 27 वर्षीय वाहन चालक गणेश भीमराव खैरनार यास वाहन परवाना पासची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. सागवान पलंग व सोफासेट मालाचे मोजमाप घेतले असता 0.524 घ.मी एवढा असून या मुद्देमालाचा बाजार भाव अंदाजे किंमत 64,500 रुपये असून ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहतूक वाहनाची अंदाजे किंमत 1,26,000 रू. असून एकूण रक्कम 1,90,500 एवढी आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनाच्या पुढील चौकशीसाठी वाहन आगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. ही कारवाई ही वनसंरक्षक धुळे (प्रा.) वनवृत्त धुळ्याच्या नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख व विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे आर. आर. सदगीर तसेच चोपडा येथील सहायक वन संरक्षक प्रथमेश हळपे, सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय ना. बावणे, रावेरचे वनपाल रवींद्र सी. सोनवणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक जुनोना जगदीश जगदाळे यांनी पार पाडली.