Mangala Express Theft | मंगला एक्स्प्रेसमधील लॅपटॉप चोरट्यांना बेड्या; चौघांची टोळी जेरबंद

८५ हजारांचे दोन लॅपटॉप हस्तगत; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई
Bhusawal Railway Police
Bhusawal Railway PolicePudhari
Published on: 
Updated on: 

Bhusawal Railway Police

जळगाव : मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लॅपटॉप बॅगा हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीचा भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 'ऑपरेशन यात्री सुरक्षा'अंतर्गत राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ८५ हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप हस्तगत केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी या टोळीपर्यंत धडक मारली.

भुसावळ स्थानकावर प्रवाशांच्या बॅगा हिसकावल्या

उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी अब्दुल अजीम शेख (वय २४) हे मित्रासह ८ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगला एक्स्प्रेसने (गाडी क्रमांक १२६१८) प्रवास करत होते. गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर दाखल झाली असता, २० ते २५ वयोगटातील चार ते पाच तरुण एस-६ डब्यात शिरले. यावेळी त्यातील दोघांनी प्रवाशांच्या हातातील दोन लॅपटॉप बॅगा जबरदस्तीने हिसकावून घेतल्या आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला.

Bhusawal Railway Police
Jalgaon news: चोपड्यातील खाऱ्यापाडावमध्ये गांजाची ‘तगडी’ शेती; ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त

या बॅगांमध्ये ४५ हजार रुपये किमतीचा आसुस कंपनीचा आणि ४० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप होता. याशिवाय दोन्ही प्रवाशांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि आठ हजार रुपये रोख असा एकूण ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींचा माग काढण्यात यश

या घटनेनंतर पीडित प्रवाशाने ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), लोहमार्ग पोलीस (जीआरपी), सीपीडीएस आणि सीआयबी पथकाने संयुक्त तपास सुरू केला.

Bhusawal Railway Police
Jalgaon News | ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; शिरसाळा पाझर तलावाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

भुसावळ शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून संशयितांचा माग काढत पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत पापा नगर येथील सलमान अब्दुल गफूर (वय २४) आणि मुस्लिम कॉलनीतील समीर अली शेरू अली (वय २४) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या घराची झडती घेतली असता चोरीचे दोन्ही लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागले.

चौघांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपींनी मंगला एक्स्प्रेसमधून लॅपटॉप चोरल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या माहितीच्या आधारे पापा नगर येथील शेख दानिश शेख अकील (वय २०) आणि काझी प्लॉट येथील जाहिद फकीर तडवी (वय १९) या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली. या चौघांना गुन्ह्यात निष्पन्न करण्यात आले असून, लोहमार्ग पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.