

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने एप्रिल २०२५ मध्ये तिकीट तपासणी मोहिमेद्वारे १०.९२ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा केला आहे. ही रक्कम विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक मासिक महसूल असून, निर्धारित उद्दिष्टापेक्षा १८ टक्के अधिक आहे.
विविध मेल व एक्सप्रेस, पॅसेंजर तसेच हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये सातत्याने राबवण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेमुळे विनातिकीट व अनियमित प्रवासास तसेच प्रवास नियमांच्या उल्लंघनास आळा बसला. यामुळे केवळ महसूलवाढच नव्हे, तर प्रवाशांमध्ये शिस्तबद्ध प्रवासाची जाणीवही अधिक दृढ झाली आहे.
विनातिकीट प्रवासी प्रकरणे: ६८,००० — दंड वसूल: ₹७.४२ कोटी
अनियमित तिकिटे प्रकरणे: ५६,००० — दंड वसूल: ₹३.४९ कोटी
बुक न केलेल्या सामान प्रकरणे: १६० — दंड वसूल: ₹४४,०००
एप्रिल महिन्यात १.२४ लाख प्रकरणांतून कारवाई करून एकूण ₹१०.९२ कोटींची वसुली करण्यात आली. ही कामगिरी मे २०२२ मध्ये नोंदवलेल्या ₹९.९७ कोटींच्या मागील विक्रमापेक्षा ₹९५ लाखांनी अधिक आहे. भुसावळ विभागाची ही उल्लेखनीय कामगिरी तिकीट तपासणी विभागाच्या कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना ठरत आहे.