Jalgaon Illegal Sand Mining | गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा: २ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाक शिवारात अवैध वाळू उपशावर मध्यरात्री कारवाई; सात डंपर, तीन ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी जप्त
Illegal sand mining
Illegal sand miningpudhari photo
Published on: 
Updated on: 

Bhadgaon Girna River Sand Mining

जळगाव : भडगाव तालुक्यातील वाक शिवारातील गिरणा नदीपात्रात विनापरवाना वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सात डंपर, तीन ट्रॅक्टर, दोन जेसीबी आणि १७ ब्रास वाळू असा एकूण २ कोटी १२ लाख ८० हजार ३४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १२ वाहनचालकांसह संबंधित वाहनमालकांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटे नदीपात्रात छापा

वाक शिवारातील गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी प्रसाद रमेश दुदुस्कर आणि त्यांच्या पथकाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास नदीपात्रात अचानक छापा टाकला. त्यावेळी डंपर आणि अन्य वाहनांमध्ये वाळू भरून वाहतुकीची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले.

महसूल पथकाने वाहने ताब्यात घेऊन ती भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाहने कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली. मात्र, कारवाईच्या भीतीने चालक वाहने सोडून पसार झाले. त्यानंतर पंचनामा आणि मुद्देमालाचे मूल्यांकन पूर्ण करून २२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

वाहने आणि वाळूची लाखोंची किंमत

या कारवाईत सात डंपरची किंमत प्रत्येकी २० लाख रुपये, तीन ट्रॅक्टरची किंमत प्रत्येकी चार लाख रुपये, तर दोन जेसीबींची किंमत प्रत्येकी ३० लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय १७ ब्रास वाळूची किंमत ८० हजार ३४२ रुपये आहे. अशा प्रकारे एकूण जप्त मुद्देमालाचे मूल्य २ कोटी १२ लाख ८० हजार ३४२ रुपये झाले आहे.

जप्त केलेल्या डंपरपैकी काहींचे मालक मालेगाव, पारोळा आणि भडगाव परिसरातील आहेत. ट्रॅक्टर आणि जेसीबींचे मालकही परिसरातील विविध गावांतील असल्याचे महसूल विभागाच्या फिर्यादीत नमूद आहे.

वाहनमालकांविरुद्ध गुन्हा दाखल

ग्राम महसूल अधिकारी प्रसाद दुदुस्कर यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बारा वाहनचालकांसह संबंधित डंपर, ट्रॅक्टर आणि जेसीबी मालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील राजेंद्र सोनवणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news