

जळगाव : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चलन सेवांचा गैरफायदा घेत काही व्यक्ती बनावट वेबसाइट, मोबाईल ॲप्स आणि संशयास्पद लिंकच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
काही बनावट मेसेजमध्ये आपल्या वाहनाचे चलन बाकी आहे, त्वरित दंड भरा किंवा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे, त्वरित तपासा असे संदेश पाठवून अनधिकृत पेमेंट लिंकवर पैसे भरण्यास प्रवृत्त करतात.
RTO Services.apk
mParivahan_Update.apk
eChallan_Pay.apk अशी फर्जी APK फाईल्स डाऊनलोड करण्यास सांगून सामान्य नागरिकांना जाळ्यात अडकवत आहेत.
अशा अनधिकृत लिंक किंवा फर्जी ॲप्समुळे OTP, बँक माहिती आणि मोबाईलमधील संवेदनशील डेटा चोरी जाण्याचा धोका असतो. RTO कार्यालय किंवा परिवहन विभाग कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठवत नाही, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागरिकांनी केवळ gov.in ने समाप्त होणाऱ्या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा.
वाहन नोंदणीसाठी vahan.parivahan.gov.in
ड्रायव्हिंग लायसन्स सेवांसाठी sarathi.parivahan.gov.in
परिवहन सेवांसाठी parivahan.gov.in आणि
ई-चलनासाठी echallan.parivahan.gov.in
ही संकेतस्थळे अधिकृत असल्याचे विभागाने सांगितले.
या साइट्स उघडू नका
.com, online, site किंवा .in अशा डोमेनवरील अनधिकृत साइट्स उघडू नयेत, असेही सूचित केले.
संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास त्वरित National Cyber Crime Portal (cybercrime.gov.in) सायबर फसवणूक हेल्पलाईन 1930 किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले.