Jalgaon robbery | भरदिवसा स्टेट बँकेवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा फज्जा; भोकर ग्रामस्थांनी सिनस्टाईल पाठलाग करत दरोडेखोरांना पकडले!

स्टेट बँकेत व्यवस्थापक, कॅशियरला बांधून मारहाण; लाखोंची रोकड-दागिन्यांसह ३ जण जेरबंद, १ फरार
Jalgaon robbery | भरदिवसा स्टेट बँकेवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा फज्जा; भोकर ग्रामस्थांनी सिनस्टाईल पाठलाग करत दरोडेखोरांना पकडले!
Jalgaon robbery | भरदिवसा स्टेट बँकेवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा फज्जा; भोकर ग्रामस्थांनी सिनस्टाईल पाठलाग करत दरोडेखोरांना पकडले!
Published on: 
Updated on: 

​भोकर: जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर आज भरदिवसा चार सशस्त्र दरोडेखोरांनी थरारक दरोडा टाकला. बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि रोखपाल (कॅशियर) यांना मारहाण करत दोरीने खुर्चीला बांधून ठेवले आणि शस्त्रांचा धाक दाखवत तिजोरीतील रोकड व दागिन्यांची बॅग लंपास केली.

मात्र, पळून जाण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक ग्रामस्थांनी अंगावर धावून जात दरोडेखोरांची कोंडी केली. संतप्त नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करत चारपैकी तीन दरोडेखोरांना जागेवरच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले, तर एक जण दुचाकीवरून पसार झाला. नागरिकांच्या समयसूचकतेमुळे लुटलेली संपूर्ण रोकड आणि दागिन्यांची बॅग हस्तगत करण्यात यश आले आहे.

​व्यवस्थापक, रोखपालाला बांधून मारहाण

दुपारच्या सुमारास वर्दळ कमी असल्याची संधी साधत चार दरोडेखोर शस्त्रास्त्रांसह बँकेत घुसले. आत शिरताच त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करत थेट व्यवस्थापक आणि रोखपालावर हल्ला चढवला. दोघांनाही बेदम मारहाण करून खुर्चीला घट्ट बांधून ठेवले आणि तिजोरीतील रोकड, दागिने बॅगेत भरून पोबारा करण्याचा प्रयत्न केला.

​नागरिकांचे धाडस; तिघांना चोपून पोलिसांच्या हवाली केले

बँकेत गडबड झाल्याचे लक्षात येताच बाहेरील नागरिकांनी तत्काळ बँकेकडे धाव घेतली. दरोडेखोर बाहेर पडत असतानाच ग्रामस्थांनी त्यांना घेरले. यात झटापट करत नागरिकांनी तिघांना जागीच पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, एक दरोडेखोर डोक्यात हेल्मेट घालून दुचाकीवर सुसाट वेगाने पसार झाला. त्याचा पळतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

​मुद्देमाल सुरक्षित; पसार आरोपीच्या शोधासाठी नाकाबंदी

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांनी पकडलेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांनी लांबवलेली रोकड आणि दागिन्यांची बॅग पूर्णपणे हस्तगत केली आहे. बँकेतून नेमकी किती रोकड लांबवण्याचा प्रयत्न झाला, याचे अधिकृत ऑडिट बँकेकडून सुरू आहे.

​"भोकर स्टेट बँक शाखेवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या चारपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार झालेल्या चौथ्या आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी लावून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे."

— पोलीस अधीक्षक, जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.