

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील लाखो केळी उत्पादक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडत खासदार स्मिता वाघ यांनी ओला दुष्काळ -विमा संरक्षणाची मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्याची मागणी केली. देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावची ओळख असली तरी अनिश्चित हवामान, अनियमित पावसाचे चक्र, ओला दुष्काळ आणि उच्च आर्द्रता यामुळे मागील काही वर्षांत पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
सध्याच्या हवामान आधारित फळस्वर विमा योजनेत ओला दुष्काळ जोखीम कालावधी १ जानेवारी ते ३० एप्रिल असा निश्चित आहे. मात्र प्रत्यक्षात मे महिन्याच्या अखेरीपर्यंतही ओला दुष्काळ आणि आर्द्रतेचा धोका कायम राहतो. सलग ३ ते ४ दिवस पाऊस आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता राहिल्याने वाढ, दर्जा आणि उत्पादन यावर गंभीर परिणाम होतो, असे कृषी विभाग आणि स्थानिक हवामान केंद्राच्या अहवालांमधून दिसून येते.
वाघ यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान हे केवळ कागदोपत्री नोंदवल्या जाणाऱ्या दिवसापुरते मर्यादित नसून बदलत्या हवामानामुळे संपूर्ण कालावधी विस्तारित झाला आहे. त्यामुळे विमा जोखीम कालावधी ३१ मेपर्यंत वाढवणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि तातडीचे आहे. तसेच सलग टिकणाऱ्या प्रतिकूल हवामान परिस्थितींनाही विमा संरक्षणात समाविष्ट करावे, अशी त्यांनी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या पिकांच्या संरक्षणाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास खासदार वाघ यांनी व्यक्त केला आहे.