

जळगाव : जैन हिल्स येथे पारंपारिक पद्धतीने पोळा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी नृत्य, ढोलताशांचा गजर, संबळ वादन आणि वृषभ राजाची भव्य मिरवणूक यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शहरातील मान्यवर, विद्यार्थी, शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन यांनी सुरू केलेली परंपरा गेली २९ वर्षे अखंड सुरू असून, कृषीसंस्कृतीचे महत्त्व नव्या पिढीला समजावे यासाठी शाळा-काॅलेजमधील विद्यार्थ्यांनाही या उत्सवाला विशेष आमंत्रित केले जात असते.
जैन हिल्स येथील ध्यानमंदिरातून बैला पोळा सणाची मिरवणुकीस सुरुवात झाली. कंपनीच्या विविध ठिकाणांहून आलेल्या सालदारांनी यावेळी सजवलेल्या बैलजोड्यांनी गावोगावी पाहुणचार मिळवला. श्रद्धेय मोठेभाऊ भवरलाल जैन यांच्या स्मृतिस्थळ ‘श्रद्धाज्योत’ येथे अभिवादन करून मिरवणूक सरस्वती पॉईंट, गुरुकुल मार्गे हेलीपॅड मैदानात दाखल झाली. येथे अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज फडकावून उत्सवाची सुरुवात झाली.
या वेळी कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी पोळा फोडण्याच्या पारितोषिकात वाढ करून एकूण २० हजार रुपये मान्यवरांच्या हस्ते वितरित केले. यामध्ये हंसराज थावरस जाधव व अविनाश गोपाळ (५ हजार रुपये प्रत्येकी) आणि दिलीप पावरा, साजन पावरा (२ हजार रुपये प्रत्येकी) यांना मानाचा पोळा फोडण्याचा मान देण्यात आला. तसेच गोविंद पावरा, भगवान सावळे, वाल्मिक शिंदे, किशोर शिंदे, रामसिंग पवार यांना गौरविण्यात आले.
बैल पोळा उत्सवाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सौ. ऐश्वर्या रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, डॉ. शेखर रायसोनी, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, महाराष्ट्र क्रेडाई उपाध्यक्ष अनिश शहा, गांधी रिसर्च फाऊंडेशन व अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील शेतकरी तसेच शहरातील मान्यवर उपस्थित झाले होते.
जैन हिल्ससह जैन वाडा, जैन सोसायटी शिरसोली, गोशाळा, भाऊंची सृष्टी आदी ठिकाणी राबणाऱ्या ३१ सालदार व ३२ पेक्षा अधिक बैलजोड्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.
त्यानंतर ढोलपथकातील १०० वादकांनी तालबद्ध वादन करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी आदिवासी नृत्य, अनुभूती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष, बँड पथकाचे सादरीकरणामुळे वातावरण रंगल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे अशोक जैन, अतुल जैन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही वाद्यांच्या तालावर ठेका धरून आनंद व्यक्त केला.