

जळगाव: जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनेक्स सनराइज जी. एच. रायसोनी “जळगाव ओपन २०२५” राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आज जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झाले. रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँड कल्चर प्रायोजित, तर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड व जळगाव जिल्हा क्रीडा संघ सहप्रायोजित ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेची मान्यता प्राप्त असून २४ ते २८ डिसेंबर दरम्यान होत आहे.
उद्घाटन समारंभास रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँड कल्चरच्या प्रीती अग्रवाल, जी. एच. रायसोनी कॉलेजचे रफिक शेख, जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे सहसचिव सचिन गाडगीळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य पंच ब्रिजेश गौर, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी तसेच शेखर जाखेटे उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष अतुल जैन यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करताना प्रीती अग्रवाल म्हणाल्या की, जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या प्रयत्नांमुळे अनेक खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन हे अकॅडमीच्या संघभावनेचे फलित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांतील एकूण २४३ खेळाडू सहभागी झाले आहेत. ९, ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुली, तसेच १९ वर्षांवरील खुला गट आणि ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटातील पुरुष व महिला खेळाडू एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी प्रकारात स्पर्धा करत आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव विनीत जोशी यांनी केले.