जळगाव : जिल्ह्यातील पंचवार्षिक पशुगणनेच्या प्रक्रियेला सुरवात मंगळवार (दि.26) पासून झाली आहे. 28 फेब्रवारी पर्यंत ही मोहीम चालणार आहे. तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या हस्ते या पशुगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच हो मोहीम राबवली जाते. मागील पशुगणना २०१९ मध्ये झाली होती. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. पशुगणनेसाठी प्रगणकांची नेमणुक केली आहे. त्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे.
पाच वर्षापुर्वी पशुगणनेने वेळी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरुन घेतली होती आता प्रगणकांना स्वतःचे मोबाईल वापरावे लागणार आहेत. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ़्टवेअरवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. प्रगणकांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला देण्यात येणार आहे.
पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या मेहीमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते. त्यानुसार शासनाकडून धोरण,योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरणासाठी औषधाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, रणधीर सोमवंशी,जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी यांनी केले.