

Jalgaon Amalner Fuel Crisis
जळगाव : अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे तापी नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे जळगाव जिल्ह्यात शेतकरी, सर्वसामान्यांना डिझेल मिळत नसताना दुसरीकडे या वाळू उपसा करणाऱ्यांकडे चक्क 10 ते 12 बॅरेल डिझेल सापडले.
तापी नदी पात्रात वाळू उपशाची अधिकृत मंजुरी सावखेड्याच्या ठिकाणी असताना धावडा शिवारातून मोठ्या प्रमाणात बोटींच्या सहाय्याने आणि १२ ते १४ चाकी अवाढव्य डंपरच्या माध्यमातून वाळू उपशाचा सुरू होता. अखेर या अवैध वाळू उपशावर प्रशासनाने कारवाई केली असून या कारवाईत 10 पोकलेन मशीन, 10 डंपर आणि 6 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, वाळू चोरांकडे 'बॅरल'चे उधाण!
एकीकडे अमळनेर तालुक्यामध्ये कडक नियमांचे कारण पुढे करत सामान्य शेतकऱ्यांना शेतीकामासाठी साध्या कॅनमध्ये डिझेल दिले जात नाहीये. नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असताना, दुसरीकडे मात्र याच वाळू वाहतूकदारांना राजरोसपणे आणि मोठ्या प्रमाणात डिझेल थेट नदीपात्रात 'बॅरल'च्या बॅरल उपलब्ध आहे. यावरून इंधनाचा आणि काळ्या बाजाराचा मोठा साखळी गट तालुक्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. घटनास्थळावरुन तब्बल 10 ते 12 बॅरल डिझेलही जप्त करण्यात आले असून पुढची कडक कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या महाकारवाईनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात थेट कठोर भूमिका घेतली आहे. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सर्व डंपर आणि वाहनांचे आरटीओ (RTO) परवाने तात्काळ निलंबित केले जाणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता अमळनेर तालुक्यातील धावडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे व जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून वाहनांचा परवाना रद्द करण्यात येऊन पेट्रोलियम कायद्याअंतर्गत साठा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.