

भुसावळ (जळगाव ) : भुसावळ शहरातील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाने एक अजब प्रकार हाती घेतल्याचे समोर आले आहे. शहरातील खडका रोडवरील रस्त्यावर पूर्वी डांबरीकरण आणि नंतर त्याच रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, "नेमका हा रस्ता डांबरी आहे की काँक्रिट?" असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सध्या शहरात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्ती व नव्याने रस्ते तयार करण्याच्या कामांना वेग आलेला आहे. खडका, किन्ही, खंडाळा परिसर व मुख्य रस्त्यांना जोडणारा खडका रोड या कामाचा भाग आहे. या रस्त्याचे प्रथम डांबरीकरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याच रस्त्यावर सिमेंट काँक्रिट टाकले जात आहे. एकाच रस्त्यासाठी डबल खर्च का केला जातोय, याबद्दल नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. याशिवाय, रस्ता बनवताना परिसरातील दुकानांमध्ये पाणी जाऊ नये, याची खबरदारीही घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या बाजूने ‘अमृत योजने’ची पाईपलाइन टाकण्यात आली आहे. त्याच ठिकाणी आता रस्त्याचे प्रथम डांबरीकरण आणि त्यावर काँक्रिटीकरण केले जात आहे.
सिमेंट काँक्रिट रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो किमान २१ दिवस वापरासाठी बंद ठेवणे आवश्यक असते. मात्र येथे ठेकेदार व संबंधित अधिकारी नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. रस्ता तयार झाल्यानंतर केवळ १२ तासांतच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येतोय, त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत तसेच वापरण्यात आलेल्या साहित्याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.