जळगाव : आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा जवळ येत असतानाच, जळगाव जिल्हा प्रशासनाचा वसुलीचा रथ चिखलात रुतल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. शासनाने दिलेले जमीन महसूल आणि गौण खनिजाचे उद्दिष्ट गाठण्यात जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला सपशेल अपयश आले असून, ५ फेब्रुवारीपर्यंत केवळ ४०.३३ टक्केच एकूण वसुली झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा मुख्यालय असलेल्या जळगाव तालुक्यासह भुसावळ, पाचोरा आणि रावेर यांसारख्या बड्या तालुक्यांची कामगिरी पाहता, हे अधिकारी नेमके करतात काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
जमीन महसूल वसुलीमध्ये जिल्ह्याची सरासरी केवळ २५.९४ टक्के आहे. यामध्ये जळगाव तालुक्याची अवस्था अत्यंत दयनीय असून, ४९९६ लाखांच्या उद्दिष्टापैकी केवळ ८३२ लाख (१६.६६%) वसुली झाली आहे. बोदवड, भुसावळ, पाचोरा, रावेर आणि पारोळा या तालुक्यांनीही शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचेच काम केले आहे. ५ फेब्रुवारी उलटूनही अनेक तालुक्यांनी ३० टक्क्यांचा टप्पाही ओलांडलेला नाही.
जमीन महसूल , तालुका उद्दिष्ट , वसुली , टक्केवारी
जळगाव : 4996.22, 832.38, 16.66
बोदवड : 280.00, 55.07, 19.67
यावल : 380.00, 164.76, 43.36
भुसावळ : 930.00, 224.70, 24.16
पाचोरा : 1080.00, 278.15, 25.75
रावेर : 410.00, 200.26, 25.76
पारोळा : 410.00, 98.09, 23.92
चाळीसगाव : 770.00, 316.18, 41.06
मुक्ताईनगर : 590.00, 265.06, 44.93
भडगाव : 280.00, 65.45, 23.38
एरंडोल : 350.00, 113.65, 32.47
जामनेर : 980.00, 260.65, 26.60
अमळनेर : 1010.00, 224.18, 22.20
धरणगाव : 490.00, 173.01, 35.31
चोपडा : 410.00, 195.63, 47.72
एकूण : 13366.22, 3467.22, 25.94
गौण खनिज वसुलीत जिल्ह्याने ५३.१५ टक्के मजल मारली असली, तरी यातही विषमता मोठी आहे. अमळनेर तालुक्याने ९२.७४ टक्के वसुली करून जिल्ह्याची अब्रू वाचवली आहे, तर दुसरीकडे यावल (२४.४०%), रावेर (२५.६५%) आणि बोदवड (२९.७८%) या तालुक्यांनी गौण खनिज चोरीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले की काय? अशी शंका घेण्यास वाव आहे.
गौण खनिज वसुली
तालुका , उद्दिष्ट , वसुली , टक्केवारी
जळगाव : 1300.00, 826.58, 63.58
बोदवड : 550.50, 163.92, 29.78
यावल : 592.00, 144.45, 24.40
भुसावळ : 1505.00, 562.62, 37.37
पाचोरा : 1262.22, 523.61, 41.48
रावेर : 680.40, 174.54, 25.65
पारोळा : 565.00, 270.03, 47.79
चाळीसगाव : 1585.00, 675.60, 42.62
मुक्ताईनगर : 714.00, 316.28 , 44.27
भडगाव : 809.00, 423.08, 52.30
एरंडोल : 1314.00, 672.68, 51.19
जामनेर : 1150.00, 939.50, 81.70
अमळनेर : 1016.48, 942.67, 92.74
धरणगाव : 1360.00, 899.57, 66.15
चोपडा : 595.20, 437.27, 73.47
एकूण : 15000.00, 7972.40, 53.15
मार्च एंडिंगला आता जेमतेम दीड महिना शिल्लक आहे. जमीन महसुलात ७४ टक्के आणि गौण खनिजात ४७ टक्के वसुली अजूनही बाकी आहे. शासनाचा खजिना भरण्याऐवजी महसूल यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहे. जर उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, तर जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदारांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.