

जळगाव : पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील २६ वर्षीय सुनील उत्तम सोनार याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवार (दि.18) रोजी रात्री सुमारे ११ वाजता जारगाव चौफुली येथे आयशर वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
सुनील सोनार जारगाव चौफुली परिसरात चहाची टपरी चालवत होता. मंगळवारी रात्री टपरी बंद करून तो दुचाकीने घरी जात असताना ही दुर्घटना घडली. धडक इतकी जबरदस्त होती की तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर सुनीलला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या मृत्यूने सोनार कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सुनीलच्या मागे आई, भाऊ आणि वाहिनी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अज्ञात आयशर वाहनाचा शोध सुरू आहे.