

जळगाव : शहराजवळील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर शुक्रवारी (दि.१२) पहाटे झालेल्या भीषण अपघातात कडगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, दुचाकीस्वाराचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव संजय पोपट पाटील (वय २७, रा. कडगाव) असे असून, जखमी तरुणाचे नाव गणेश बाबुराव बाविस्कर (वय ३५, रा. कडगाव) असे आहे.
संजय पाटील हा आई-वडील व बहिणीसह कडगाव येथे राहत होता. मजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरुवारी (दि.११) मध्यरात्रीनंतर तो गणेश बाविस्करसह दुचाकीवरून जळगावहून कडगावकडे जात असताना, समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश बाविस्कर गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून घटनेनंतर संजय पाटील यांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयात नातेवाईक आणि गावकऱ्यांची गर्दी झाली. एकुलत्या एका मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.