जळगाव : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सुदर्शन पेपर मिलच्या समोर गाढ झोपेत असलेल्या एका ३८ वर्षीय मजुराला वाळूने (रेती) भरलेल्या डंपर चालकाने रिव्हर्स घेताना थेट चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, अपघात घडल्यानंतर चालक डंपरसह घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाभैय्या नत्थू (वय ३८, मूळ रा. धरदुवा, जि. बांधा, उत्तर प्रदेश; सध्या मुक्काम - सुदर्शन पेपर मिल, ता. भुसावळ) हे मजूर सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्स कंपनीच्या समोर झोपलेले होते. ४ जून २०२६ रोजी रात्री २:५० वाजेच्या सुमारास रेतीने भरलेला डंपर क्रमांक एम एच 19 झेड 8388 घेऊन आलेल्या अज्ञात चालकाने आपले वाहन मागे (रिव्हर्स) घेण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे खाली झोपलेल्या राजाभैय्या यांच्या अंगावर चालकाचे लक्ष गेले नाही. डंपरचे अवजड टायर थेट राजाभैय्या यांच्या डाव्या खांद्यावरून आणि मानेवरून गेले. हा अपघात इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने राजाभैय्या यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
आपल्या वाहनाखाली माणूस चिरडला गेल्याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपी चालकाने माणुसकीला काळिमा फासला. त्याने गंभीर जखमीला रुग्णालयात नेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, की या घटनेची माहिती कोणाला दिली नाही. अपघात लपवण्याच्या हेतूने चालक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन डंपरसह घटनास्थळावरून पळून गेला. सदर घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज जनार्दन मंडलिक (वय ४९) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. ऑनलाईन कनेक्टिव्हिटी (CCTNS प्रणाली) बंद असल्यामुळे या गुन्ह्याची नोंद करण्यास उशीर झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.