जळगाव : यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मातेच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांच्या कारचे टायर फुटल्याने ही कार थेट शिवशाही बसला धडकली. अपघात इतका भीषण होता की त्यात तीन जण जागीच ठार झाले व एक जण जखमी आहे.
ही घटना आज मंगळवार दि. 8 चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ घडली. नवरात्रीचा उत्सव सुरू असल्याने भाविक आपल्या कुलदैवत किंवा श्रद्धा असलेल्या देवीस्थानावर मोठ्या संख्येने जात आहे.
निजामपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी श्रीधर बंडू राणे यांचे पुत्र निलेश (40) आणि शैलेश (38) हे व त्यांचे मित्र जितेंद्र मुरलीधर भोकरे (४८) हे कारने यावल तालुक्यातील सातपुडा पर्वता मधील मनूदेवीच्या दर्शनासाठी येत होते. रात्री नाशिक येथून मातेच्या दर्शनाला ते निघाले होते. मात्र श्री मनुमातेच्या दर्शनापूर्वीच त्यांच्या कारचे टायर फुटुल्याने कार अनियंत्रित होऊन ती चोपडा येथून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसला धडकली. यामध्ये कारमधील निलेश आणि शैलेश आणि जितेंद्र भोकरे या तिघांचा जागेवर मृत्यू झाला.
तर या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली.