

जळगाव : तापी नदीकाठावरून वाळू घेऊन परत येत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवार (दि.20) रोजी घडली.
या भीषण अपघातात तोहीत शाह इस्माईल शाह (वय 21, रा. पिंपरीनांदू) याचा मृत्यू झाला. तो रोजंदारीवर मजुरीचे काम करत होता. सोमवार (दि.20) रोजी तो नदीकीनारी वाळू भरण्यासाठी गेला होता. वाळू भरून गावाकडे परतत असताना शेतातील रस्त्यावर ट्रॅक्टर (आयशर 485) आणि ट्रॉली अचानक पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर बाजूला करत तोहीत शाह याला बाहेर काढण्यात आले, त्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे नेल्यानंतर डॉक्टरांनी तोहीत शाह हा वाळूच्या ट्रॉलीखाली दबला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
या ट्रॅक्टरमध्ये तोहीत शाहसोबत असलेला अनिकेत संदीप इंगळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला गावातीलच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
विना नंबरचा ट्रॅक्टर
या अपघातातील फिर्यादी सलीम शाह करीम शाह (वय ३९, रा. पिंपरीनांदू) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त आयशर 485 हा ट्रॅक्टर आणि ट्रॉली दोन्ही विना क्रमांकाचे होते. त्यामुळे अनधिकृत वाळू वाहतूक आणि विना नंबर वाहनामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल लीलाधर भोई पुढील तपास करत आहेत.