

जळगाव : मामा सोबत जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेल्या नववर्षीय भाच्याचा डंपरच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. ही घटना कालिंका माता चौकात साडेसात वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, योजेस हा मुलगा आपले आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. आज त्यांचे भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी भाची भक्ती आणि भाचा योजस यांच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजेस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. यावेळी अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस प्रशासन या डंपरवर कधी कारवाई करणार या डंपरच्या मागे अनेक वेळा नंबर प्लेटही नसतात तसेच आरटीओ यांच्यावर कारवाई करेल की नाही, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. त्यांना भर वस्तीतून डंपर नेण्याची परवानगी दिली कोणी असाही यावेळी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला.