

जळगाव : “आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाईम, कृत्रिम तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि माहिती तंत्रज्ञानाची झपाटलेली गती पाहता, समाजाला दिशा देणारी पिढी घडवण्याचे प्रयत्न कमी पडताना दिसतात. मात्र, ‘अनुभूती निवासी स्कूल’ आणि ‘अनुभूती बालनिकेतन’ नंतर आता सीबीएसई पॅटर्नवरील ‘अनुभूती विद्यानिकेतन’च्या माध्यमातून बौद्धिक, सृजनशील, जीवनकौशल्य आणि शारीरिक आरोग्याचा सर्वांगीण विकास घडवणारी दिशा ठरावी,” असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले.
‘अनुभूती विद्यानिकेतन’च्या उद्घाटनप्रसंगी ते पालकांशी संवाद साधत होते. अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मनोज परमार, शोभना जैन, अंबिका जैन, अर्थम जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सरस्वती पूजनानंतर संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन यांचे प्रतिमापूजन करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर ब्रह्मवृदांनी शांती मंत्र पठण केले तर शिक्षिकांनी प्रार्थना सादर केली. समारोपात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
अनिल जैन म्हणाले की, “भवरलाल जैन यांनी ‘जे जे चांगले ते आपल्या गावात यावे’ या विचारातून ‘अनुभूती निवासी स्कूल’ सुरू केली. त्याच दृष्टीकोनातून ‘अनुभूती बालनिकेतन’ची स्थापना झाली आणि आता त्यांच्या स्वप्नांचा पुढचा टप्पा म्हणून ‘अनुभूती विद्यानिकेतन’ साकार झाला.”
गुरुकुल पद्धतीवर आधारित या शाळेत विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) तसेच कला क्षेत्रात शिक्षणासाठी विशेष कक्षांची व्यवस्था आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे विचारशक्ती, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित होतील. “विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच जग अधिक सुंदर करण्याचा विचार मनाशी ठेवावा, यासाठी शिक्षक आणि पालकांनीही भान ठेवणे गरजेचे आहे,” असे जैन यांनी नमूद केले.
सीबीएसई पॅटर्नची ही पहिली बॅच ‘लिडर बॅच’ म्हणून ओळखली जाईल. पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी मेहरूणच्या निसर्गरम्य परिसरात संपूर्ण शाळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनोज परमार यांनी प्रास्ताविक करताना जैन परिवाराचा शिक्षणविषयक दृष्टिकोन मांडला. त्यांनी ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ या पुस्तकातील भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांचा उल्लेख केला. “फक्त प्रवेश घेऊन थांबू नका, तर भविष्यातील पिढी घडविण्यासाठी पालकांनीही सक्रिय भूमिका घ्यावी,” असे ते म्हणाले. कार्यक्रमास पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.