

जळगाव : राजकारणात वाऱ्याच्या दिशेसारखे बदल होत असतात, याचे ताजे उदाहरण म्हणजे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे. कधी विरोधी पक्षनेते, कधी बारा खात्यांचे मंत्री, तर कधी मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार – अशी त्यांच्या राजकीय प्रवासाची शिखरं होती. मात्र, भाजपमधील अंतर्गत संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि शेवटी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेला प्रवेश ! या साऱ्यांमुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत मोठी उलथापालथ झालेली दिसून येत आहे.
शुक्रवार (दि.20) रोजी धरणगाव येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात खडसे यांना अन्य सर्वसामान्य व्हीआयपींप्रमाणे बाजूला बसावे लागले. याउलट त्यांची सुनबाई तथा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंचावर प्रमुख उपस्थितीत विराजमान होत्या. एकेकाळी सभोवती नामदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांसारखे नेते दिसत असत; मात्र आज त्यांच्याजवळ आसपास कुणीही राजकीय वजनदार चेहरा दिसला नाही. या प्रसंगाने स्पष्टपणे दाखवून दिले की, राजकारणात परिस्थिती कशी झपाट्याने बदलू शकते. सासरे असले तरी आज सुनबाईंची राजकीय उंची अधिक भासू लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव येथे, 'उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन आणि क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाच्या उदघाटन कार्यक्रमा'साठी आगमन झाले असता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. क्रांतीवीर खाज्याजी नाईक स्मारक अनावरपणाच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे दाखल झाले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट झाली नाही.
एकनाथ खडसे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होती, हे खरं नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. औपचारिकरित्या जर भेट झाली तर भेट घेईल, असा माझा प्रयत्न होता. हा कार्यक्रम शासकीय नव्हता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात राजकीय चर्चा होईल, अशी अपेक्षा नव्हती. मी कार्यक्रमाला उपस्थित होतो व या कार्यक्रमाला मला आग्रहपूर्वक बोलवण्यात आले होते. मोजक्यात लोकांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. व्यासपीठावर फक्त मंत्री आणि संघाचे प्रचारक होते. आमदारांना व्हीआयपी कक्षात बसवण्यात आले. आम्ही विरोधी पक्षात आहोत. कर्जमुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नाही, याची खंत नाही. त्यांची शांततेत अपॉइंटमेंट घेऊन मी केव्हाही भेट घेऊ शकतो.